
दोन गटांत वादातून हाणामारी; मित्राला वाचवताना विजय कदम यांचा दुर्दैवी अंत, एक जण गंभीर जखमी


हदगाव, गौतम वाठोरे| तालुक्यातील निवघा (बा.) येथे जुगार अड्ड्यावर दोन गटांत झालेल्या वादाचे हिंसक रूप धारण झाल्याने एका २५ वर्षीय तरुणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ३१ मे) रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध जुगार अड्ड्यांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


मृत तरुणाचे नाव विजय नारायण कदम (वय २५) असे असून तो उमरजखेड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तर या घटनेत रामा गजभारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शाहिद पठाण अब्दुल खुद्दूस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.


मिळालेल्या माहितीनुसार, विजय कदम आणि रामा गजभारे हे दोघे निवघा येथील कथित जुगार अड्ड्यावर गेले होते. खेळादरम्यान पैशांच्या व्यवहारावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला झालेली शाब्दिक बाचाबाची काही वेळातच हाणामारीत परिवर्तित झाली. यावेळी आरोपी शाहिद पठाण याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे.


वाद मिटविण्याचा आणि मित्राला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना विजय कदम यांच्यावर पोटात चाकूने वार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी हदगाव रुग्णालयात नेण्यात येत होते; मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर रामा गजभारे हेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
निवघा परिसरात अवैध धंद्यांचे पेव?
हदगाव पोलीस ठाण्यापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या निवघा पोलीस चौकीच्या हद्दीत तब्बल ३२ गावे येतात. त्यामुळे या चौकीला महत्त्वाचे स्थान आहे. स्थानिकांच्या मते, निवघा गावाच्या टेकडी परिसरात गेल्या काही वर्षांत अवैध व्यवसाय, जुगार अड्डे आणि इतर बेकायदेशीर हालचालींना ऊत आला आहे. यापूर्वी पोलिसांनी कारवाईचा प्रयत्न केला असला तरी काही काळानंतर हे प्रकार पुन्हा सुरू झाल्याची चर्चा परिसरात आहे. या घटनेनंतर पोलिस प्रशासन अवैध धंद्यांवर कितपत कठोर कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
