दुर्गराज रायगडावर शिवभक्तांचा महासागर उसळणार; शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी भव्य जय्यत तयारी

५ ते ७ लाख शिवभक्तांच्या उपस्थितीची शक्यता; नांदेड जिल्ह्यातून ३ हजारांहून अधिक शिवप्रेमी रायगडकडे रवाना होणार – माधवराव देवसरकर

नांदेड, प्रतिनिधी| छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या सुवर्णक्षणांची ऐतिहासिक आठवण जागवणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा यंदाही दुर्गराज रायगडावर दिमाखात साजरा होणार असून, देशभरातून लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीने रायगड भगवामय होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ५ व ६ जून रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पारंपरिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा भव्य उत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती समितीचे सदस्य माधवराव देवसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी यंदा देशभरातून तब्बल ५ ते ७ लाख शिवभक्त, इतिहास संशोधक, अभ्यासक, पर्यटक आणि शिवप्रेमी रायगडावर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातूनच सुमारे ३ ते ३.५ हजार शिवभक्त रायगडकडे रवाना होणार असून, विविध तालुक्यांतून वाहनांचे ताफे सोहळ्यासाठी निघणार आहेत.

समितीतर्फे शिवभक्तांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहाटे रायगडावरील नगारखान्यासमोर भगवा ध्वज फडकावून सोहळ्याची सुरुवात होणार असून, त्यानंतर शिवराज्याभिषेकाचा मुख्य कार्यक्रम पार पडेल. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर सुवर्णनाण्यांचा अभिषेक करण्यात येणार आहे.

युद्धकालीन परंपरेची झलक दाखवणारी शिवकालीन युद्धकला, रणवाद्य, हलगी, घुमके व कैताळाच्या गजरात सादर केली जाणारी प्रात्यक्षिके, तसेच होळीच्या माळावर होणारे सांस्कृतिक सादरीकरण हे सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे. शिवछत्रपतींच्या प्रतिमेची भव्य पालखी, छत्र-चामरासह निघणारी शोभायात्रा आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणारे हजारो शिवभक्त यामुळे रायगडावर ऐतिहासिक वातावरण निर्माण होणार आहे.

युवराज छत्रपती संभाजीराजे शिवभक्तांना मार्गदर्शन करणार असून महिला व पुरुष ढोल-ताशा पथकांचा दमदार सहभागही यंदा विशेष ठरणार आहे. पूर्णा येथील रणवाद्य ढोल-ताशा पथक, शंभूगर्जना ढोल-ताशा पथक तसेच कोल्हापूरच्या नाद ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण शिवभक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे माधवराव देवसरकर यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला डॉ. गजानन माने, सदानंद पाटील पुयड, गजानन पाटील सोळंके, डॉ. प्रा. शिल्पाताई शेंडगे, डॉ. बालाजी पेनुरकर, सुनील पाटील कदम मरळकर, स्वप्निल पाटील सूर्यवंशी तळणीकर, मारुती पाटील गवळे, शंकर पाटील पानपट्टी, दीपक वडजे, मोहन ताटे यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!