
नांदेड विधान परिषद रणधुमाळीला वेग
नांदेड | नांदेड स्थानिक प्राधीकार मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने आता स्पष्टपणे राजकीय तापमान वाढवण्यास सुरुवात केली असून, उमेदवारी अर्ज प्रक्रियेतून नव्या राजकीय समीकरणांचे संकेत मिळू लागले आहेत. दि. 27 मेपर्यंत तब्बल 25 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले, तर एक अर्ज अधिकृतपणे दाखल झाल्याने निवडणूक रंगतदार टप्प्यात प्रवेश करताना दिसत आहे.


यात सर्वात मोठी चर्चा ठरत आहे ती खासदार पुत्र कृष्णा पाटिल यांच्या उमेदवारी अर्जामुळे आष्टीकरांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. असे असतानाच आता प्रवीण पाटील चिखलीकर आणि भास्कर वानखेडे यांनी अर्ज घेत निवडणुकीत रस दाखवल्याने समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनण्याची चिन्हे आहेत.



कृष्णा पाटिल आष्टीकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता प्रवीण पाटिल चिखलीकर आणि भास्कर वानखेडे यांच्या हालचालींनी राजकीय चर्चांना वेग दिला आहे. विशेषतः महायुतीमध्ये उमेदवारीवरून एकमत होणार की अंतर्गत स्पर्धा रंगणार, याकडे लक्ष लागले आहे.



दुसरीकडे, सलग दोनदा विजय मिळवणारे विद्यमान आमदार अमर राजूरकर यांना पुन्हा संधी मिळणार का, हा देखील चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. 2022 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रखडलेली निवडणूक आता जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.


१ जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून, २ जूनला छाननी आणि ४ जूनला अर्ज माघारीची अंतिम तारीख आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुती एकसंघ उमेदवार देणार की बंडखोरीचा सूर उमटणार? महाविकास आघाडी कोणता चेहरा पुढे करणार? आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतांवर कोण पकड मजबूत करणार? या प्रश्नांची उत्तरे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार असली तरी, “नांदेड विधान परिषद निवडणूक आता प्रतिष्ठेची लढत बनत चालली आहे”, हे मात्र निश्चित मानले जात आहे.
