‘मृत्यूचा सापळा’ ठरलेला खडकी रस्ता; दुरुस्त न झाल्यास २५ जूनला रस्ता रोको करण्याचा इशारा

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) फाटा ते खडकी (बा.) गाव तसेच खडकी (बा.) ते घारापूर या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तब्बल ८ ते १० वर्षांपासून रस्ता खड्डेमय व धोकादायक बनला असून, तात्काळ दुरुस्ती व डांबरीकरण न झाल्यास २५ जून रोजी नांदेड–किनवट महामार्गावर खडकी फाट्याजवळ रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. समस्त खडकी (बा.) येथील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावासाठी हा रस्ता जीवनवाहिनी असला तरी आज तो ‘मृत्यूचा मुख्य दरवाजा’ बनला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांना दररोज हिमायतनगरला शिक्षणासाठी जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर गंभीर बाब म्हणजे, गरोदर महिलांना उपचार व बाळंतपणासाठी रुग्णालयात नेताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.

खराब रस्त्यामुळे अनेक महिलांची प्रसूती वाहनातच झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. यामुळे माता व नवजात बालकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे. वृद्ध नागरिक, रुग्ण, शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना या रस्त्यामुळे मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मोटारसायकल चालविणेही कठीण झाले असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांनी आरोप केला की, विद्यमान आमदार, माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना वारंवार निवेदने देऊनही खडकी रस्त्याची कोणतीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे होऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून २० जून २०२६ पूर्वी दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा, “आता निवेदन नाही, थेट आंदोलन” असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी २५ जूनला रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्याने प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

खडकी (बा.) येथील विजय हनवते, दिगांबर भुरे, शरद हनवते, पांडुरंग नागनवार, अंकुश कावळे, कामाजी जाधव, अमोल सूर्यवंशी, प्रविण पवार, ओमकार रेखावार, विनोद गिमेकर, आदीसह ग्रामस्थांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!