मराठवाड्यातून संदीप उदगीरकर यांची राज्य कार्यकारिणीवर निवड

नांदेड (प्रतिनिधी) रांजणोली (ता. भिवंडी, जि. ठाणे) येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात नांदेडचे जिल्हाध्यक्ष संदीप उदगीरकर यांची मराठवाडा विभागातून राज्य कार्यकारिणीवर संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे.

या अधिवेशनात संघटनेची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी बाळासाहेब जाधव यांची एकमताने निवड झाली. तर मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करत नांदेडचे जिल्हाध्यक्ष संदीप उदगीरकर यांची संचालकपदी निवड झाल्याने जिल्ह्यातील कंत्राटदारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संदीप उदगीरकर यांनी सांगितले की, जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित देयके तातडीने अदा करावीत, अन्यथा संघटनेकडून कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारा निधी ‘स्पर्श’ प्रणाली सुरू होण्यास होत असलेल्या विलंबामुळे जुन्या प्रणालीद्वारे वितरित करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय, निधीअभावी कंत्राटदारांची बँकांकडील देणी थकली असल्याने शासनाने बँकांना वसुलीसाठी दबाव टाकू नये, तसेच जीएसटी परतावा भरण्यास होणाऱ्या विलंबामुळे कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी शासनस्तरावरून जीएसटी विभागाला सूचना द्याव्यात, असे महत्त्वाचे ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात आल्याची माहिती उदगीरकर यांनी दिली.

शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या सदस्यांवर अन्याय झाल्यास संघटितपणे न्याय मिळवून देण्यासाठी पुढेही प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!