
शेतकऱ्यांच्या लुटीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तक्रारीनंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये


हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगाम तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची खतासाठी होणारी अडवणूक, जादा दराने विक्री आणि स्थानिक साठा परस्पर बाहेर पाठविल्या जात असल्याच्या गंभीर तक्रारीनंतर कृषी विभाग अखेर अॅक्शन मोडमध्ये आला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेला खत साठा बाहेरील तालुका, जिल्हा किंवा राज्यात वळवला गेला तर संबंधित कृषी सेवा केंद्रांवर थेट कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.


या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) हिमायतनगर तालुकाध्यक्ष वामनराव पाटिल वडगांवकर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची खतासाठी कृषी दुकानदारांकडून अडवणूक व आर्थिक लूट होत असल्याची गंभीर तक्रार कृषी विभागाकडे केली होती. तसेच हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेला खत साठा परस्पर विदर्भ, तेलंगणा व बाहेरील भागात नातेवाईक व जवळच्या व्यक्तींमार्फत पाठविला जात असल्याचाही आरोप तक्रार अर्जात करण्यात आला होता.


या तक्रारीची गंभीर दखल घेत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने हिमायतनगर तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालक व खत विक्रेत्यांना सक्त ताकीद देणारे पत्र जारी केले आहे. खरीप 2026–27 हंगामासाठी तालुक्यात खताचे आवंटन झाले असून, पुढील कालावधीसाठीही पुरवठा सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे “पहिला हक्क स्थानिक शेतकऱ्यांचा” या भूमिकेतून खत विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


कृषी विभागाकडून स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला आहे की, तालुक्यात कृत्रिम खत टंचाई निर्माण करून साठेबाजी, अवैध वाहतूक किंवा बाहेरील तालुका-जिल्ह्यात खत पुरवठा होत असल्याचे आढळल्यास संबंधित कृषी सेवा केंद्रांवर तात्काळ कारवाई केली जाईल. यासाठी खत साठा, विक्री नोंदी आणि वाहतुकीवर विशेष नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर खतासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागू नयेत, तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, यासाठी कृषी विभागाने कठोर भूमिका घेतल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. आता प्रशासनाच्या या इशाऱ्यानंतर तालुक्यातील खत विक्री व्यवहारांवर किती अंकुश बसतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“शेतकरी बांधवांनी खत खरेदीसाठी शक्यतो एकटे न जाता ग्रुपने जावे. त्यामुळे गोरमेंट दराने खत मिळण्यास मदत होईल आणि कोणत्याही प्रकारची अडवणूक किंवा जादा दराची लूट होणार नाही. जर कुठलाही दुकानदार जादा दराने खत विकत असेल किंवा खत देण्यास टाळाटाळ करत असेल तर तात्काळ संपर्क साधावा. शेतकऱ्यांची फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही; शेतकरी हितासाठी आम्ही सदैव सोबत आहोत.” वामनराव पाटिल वडगांवकर , राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) तालुकाध्यक्ष, हिमायतनगर
