
लोहा | लोहा शहरातील जुन्या भागात जाणाऱ्या अरुंद रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने पाऊल पडले असून, मस्जिद परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे. ग्रामपंचायत काळात तसेच नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतरही वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला हा प्रश्न आता नगराध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या टीमच्या पुढाकारामुळे सुटताना दिसत आहे.


जुन्या शहरात जाणाऱ्या मार्गावर अतिक्रमण, नाल्यांपुढे वाढवलेल्या पायऱ्या आणि मनमानी बांधकामांमुळे रस्ता अत्यंत अरुंद झाला होता. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. मात्र नगर परिषद प्रशासनाने धाडसी भूमिका घेत या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे, शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करत काही नागरिकांनी स्वखुशीने स्वतःच्या मालकीची जागा रस्त्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.


या संदर्भात नगराध्यक्षांच्या दालनात बैठक घेण्यात आली होती. उपनगराध्यक्ष करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, गटनेते भास्कर पवार, हरिभाऊ चव्हाण, नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. बैठकीत मालमत्ताधारकांना समजावून सांगत रस्ता रुंदीकरणासाठी सहकार्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर सहा ते सात मालमत्ताधारकांनी स्वतःची घरे व जागा रस्त्यासाठी देण्याचा निर्णय घेतला.



यामध्ये साहेरबी मजीद तांबोळी, खदीर महेबूबसाब तांबोळी, शेख महेबूबसाब, शेख अब्दुल करीम, मोमीन बशीर आतार, अब्दुल रहेमान सय्यद तसेच बालाजी रामदास भातलवंडे यांनी योगदान दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, लातूर–उदगीरचे डीवायएसपी गजानन भातलवंडे यांनीदेखील जुनी इमारत पाडून जागा उपलब्ध करून शहर विकासात सहभाग नोंदविला. दरम्यान, आमदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेकडे हे पाऊल मानले जात असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध विकासकामांना वेग मिळत असल्याचे सांगितले जात आहे.



भाजी मंडई ते जुना लोहा या मार्गाचे रुंदीकरण झाल्यानंतर जुन्या शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तसेच प्रियदर्शनी नगर, इंदिरानगर, आंबेडकर नगर आणि विस्तारित वसाहतींतील हजारो नागरिकांसाठी हा मार्ग विकासाची नवी वाट ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
शहराच्या भविष्यासाठी स्वतःची जागा देणाऱ्या मालमत्ताधारकांचे नागरिकांकडून कौतुक होत असून, “ग्रामपंचायत काळात जे झाले नाही ते आता प्रत्यक्षात घडत आहे,” अशी प्रतिक्रिया शहरवासीयांमधून उमटत आहे.
