खत काळाबाजार उघड करणाऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्या?; हिमायतनगरात संताप

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहणार; “धमक्यांना भीक घालणार नाही” वामनराव पाटील वडगांवकर 
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील खत टंचाई, काळाबाजार आणि शेतकऱ्यांच्या लुटीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच हिमायतनगरातील काही कृषी दुकानदार व दलालांकडून धमकीचे राजकारण सुरू झाल्याचा गंभीर आरोप समोर करण्यात आला आहे. खताचे पार्सल बाहेर जात असल्याचे फोटो काढल्याच्या कारणावरून काही दलालांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा करण्यात आला असून, अशी पोस्ट सोशल मीडियावर वामनराव पाटील वडगांवकर यांनी व्हायरल केली आहे.

याप्रकरणी शेतकरी हितासाठी आवाज उठवणाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेत, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू केलेला लढा कोणत्याही धमकीला घाबरणारा नाही,” असा इशारा दिला आहे. खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून किंवा काळाबाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्यांनी “आपल्या औकातीत राहावे”, असा संतप्त इशाराही सोशल मीडियातून देण्यात आला आहे.

सध्या खरीप हंगाम तोंडावर असताना खत उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत काही दुकानदार इतरत्र ठिकाणी खत बाहेर वळवून काळाबाजार करत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत माहिती व पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न होत असतानाच धमक्यांचा प्रकार समोर आल्याने शेतकरी वर्गात नाराजी वाढत आहे.

“आज अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही, तर उद्या प्रत्येक शेतकरी महागड्या खताच्या नावाखाली लुटला जाईल,” अशी भावना व्यक्त करत शेतकरी हितासाठी सुरू असलेला लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा वामनराव पाटील वडगांवकर यांच्यातर्फे देण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!