
खरीप हंगाम तोंडावर, पंपांवरील गैरव्यवस्थेविरोधात प्रशासनाला सज्ज राहण्याचे आवाहन
नांदेड/हदगाव/हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर डिझेल उपलब्ध होत नसल्याने निर्माण झालेल्या अडचणींवर आता राजकीय पातळीवरही आवाज उठू लागला आहे. हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम-कोहळीकर यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरील एकूण डिझेल साठ्यापैकी ६० टक्के साठा शेतकरी व कृषी उपयोगासाठी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे.


सध्या शेतीची मशागत, पेरणीपूर्व कामे आणि सिंचनासाठी ट्रॅक्टर, पंप व इतर कृषी यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. मात्र, ऐन हंगामात अनेक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना डिझेलसाठी ताटकळत उभे राहावे लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे शेतीची कामे रखडत असून शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक फटका बसत असल्याचे आमदार कोहळीकर यांनी पत्रात नमूद केले आहे.


“अन्नदात्याला डिझेलसाठी वणवण भटकावे लागणे ही गंभीर बाब आहे,” असे म्हणत त्यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर उपलब्ध डिझेलपैकी किमान ६० टक्के इंधन शेतीकामासाठी राखीव ठेवून ट्रॅक्टर व कृषी वाहनांना प्राधान्याने वितरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


यासोबतच डिझेल वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष भरारी पथके नियुक्त करावीत, तसेच शेतकऱ्यांना अडवणूक करणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंपांवर कडक कारवाई करावी, अशीही भूमिका आमदारांनी घेतली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


