हिमायतनगरात खत टंचाई की काळाबाजार?; शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप

स्टॉक असूनही “खत संपले”चा फलक; कृषी विभागाच्या भूमिकेवर वडगांवकर यांनी उपस्थित केला प्रश्नचिन्ह
हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगाम तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना खतासाठी वणवण भटकावे लागत असून, काही कृषी सेवा केंद्रांकडून खत साठा लपवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप वामनराव पाटील वडगांवकर यांनी केला आहे. काही दुकानदारांनी दुकानाच्या नावावरील खताचा स्टॉक मित्र, नातेवाईक व इतर व्यक्तींच्या आधार कार्डवर OTP घेऊन ‘स्कॅन’ करून उडवण्याचा प्रकार सुरू केला असल्याची चर्चा शेतकरी बांधवांत रंगू लागली आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिमायतनगर शहरातील अनेक कृषी दुकानांमध्ये शेतकरी खत मागण्यासाठी गेल्यास “स्टॉक संपला” असे सांगितले जाते. मात्र, शहर व ग्रामीण परिसरातील काही खासगी गोडाऊनमध्ये DAP, युरिया, 10:26:26 आणि पोटॅश खतांचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याची चर्चा असून, प्रत्यक्षात कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप होत आहे.

विशेष म्हणजे, कृषी विभागाने प्रत्येक गोडाऊनवर संबंधित दुकानाचे नाव व माहिती दर्शविणारे फलक लावण्याचे आदेश दिले असतानाही अनेक गोडाऊनवर कोणतेही बोर्ड नसल्याने संशय अधिक बळावला आहे. खरीपच नव्हे तर रब्बी हंगामासाठी पुरेल इतका खतसाठा काही व्यापाऱ्यांकडे असल्याची चर्चा असतानाही शेतकऱ्यांना खत नाकारले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

या संपूर्ण प्रकरणात कृषी विभाग व जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी व काही राजकीय पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. “शेतकऱ्याला खत मिळणे हा त्याचा हक्क आहे, उपकार नाहीत,” अशी भूमिका घेत तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच ठेवण्याचा इशारा देत, खत वितरणातील कथित गैरप्रकार उघडकीस आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासाठी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून त्यांचा लढा सुरू असून आत्तापर्यंत शेकडो शेतकऱ्यांना शासनाच्या दरात खत उघडून दिली असल्याचे समोर आले आहे. आणखीनही बहुतांश शेतकरी आर्थिक अडचणीमुळे खते मिळविण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र आशा गरजू शेतकऱ्यांना जादा दराने खत घ्यावे लागत असल्याचे समोर आल्याने साठेबाजी करणाऱ्या कृषी दुकानदाराच्या गोदामावर छापे मारून सर्व सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना शासन दराने खत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट घेतली असून आता साठेबाजी करणाऱ्यावर काय…?कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!