
बुक्का आयावरू, आय्यावरू, दासरी व माला दासरी समाज एकच; शासन लाभांसाठी मजबूत संघटना उभारण्यावर भर


भोकर/हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| “समाज संघटना मजबूत असेल तरच समाजाला न्याय, दिशा आणि प्रगती मिळू शकते. आपसातील मतभेद विसरून समाजाच्या व भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन निझामाबाद बुक्कायावारू संगमचे अध्यक्ष रमेश सादुल्ला यांनी केले. ते तेलंगणा–महाराष्ट्र, दासरी, माला दासरी, बुक्का आयावरू व आय्यावरू समाज संघटनेची भोकर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते.


यावेळी बोलताना रमेश सादुल्ला यांनी सांगितले की, शासनाच्या मागील जनगणनेतील त्रुटींमुळे अल्पसंख्यांक समाजातील अनेक घटक वेगवेगळ्या प्रवर्गात विभागले गेले आहेत. प्रत्यक्षात बुक्का आयावरू, आय्यावरू, दासरी आणि माला दासरी समाज हा एकच असून व्यवसाय, कुलदैवत तसेच रोटी-बेटी व्यवहार अनादी काळापासून सुरू आहेत. मात्र जुन्या नोंदीतील विसंगतीमुळे शैक्षणिक दाखल्यांमध्ये वेगवेगळ्या जातींचा उल्लेख झाल्याने समाज शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहत असल्याचे त्यांनी नमूद केले.


“समाजाला न्याय मिळवायचा असेल तर संघटित व्हावे लागेल” असे सांगत त्यांनी तेलंगणा व महाराष्ट्रातील समाजबांधवांनी एकत्र येऊन मजबूत संघटना निर्माण करण्याचे आवाहन केले. समाजातील सर्व घटकांना एकाच प्रवर्गात समाविष्ट करून जातीचे प्रमाणपत्र, शासकीय योजना व उच्च शिक्षणाचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी निझामाबाद संगमचे कोषाध्यक्ष एस. तिरमल्लेश, गौरव अध्यक्ष श्री अल्लाडी कुशाद्री स्वामी, उपाध्यक्षलू सादुल्ला व्यंकटेशम, सल्लागार वनपत्री व्यंकटेशम, महाराष्ट्र दासरी माला दासरी संघटनेचे अध्यक्ष मुरहारी यंगलवार, उपाध्यक्ष बालाजी सादुलवार, सचिव बालाजी चेपूरवार, जेष्ठ समाजसेवक अरविंद शहागंटवार, नारायण सादुलवार, गणराज सादुलवार, पत्रकार गोविंद गोडसेलवार, अनिल मादसवार, सोपान बोंपीलवार, यांच्यासह तेलंगणा व महाराष्ट्रातील समाज संघटनांचे पदाधिकारी आणि भोकर, उमरखेड, हदगांव, हिमायतनगर सह विविध तालुक्यातील सदस्य, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेलंगणा राज्यात संघटनांच्या माध्यमातून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून समाजातील घटकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात यश मिळाले असून, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही समाजाच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र केला जाणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
