अद्वैत कॉलनीत श्रीमद्भागवत कथा महोत्सवाची भक्तिमय सांगता

अधिक मासानिमित्त सात दिवसीय संगीतमय ज्ञानयज्ञाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर | अधिक मासानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील अद्वैत कॉलनीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय संगीतमय श्रीमद्भागवत कथा महोत्सवाची भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने सांगता झाली. श्री. धनंजय जोशी व जोशी परिवाराच्या पुढाकारातून आयोजित या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.

या कथा महोत्सवाचे निरूपण भागवतकार स. भ. श्री. गणेश महाराज रामदासी यांनी आपल्या ओघवत्या वाणीने व संगीतमय शैलीत केले. कथेदरम्यान श्रीमद्भागवत महापुराणातील विविध प्रसंग, भगवान श्रीविष्णूंचे अवतार, भक्तीचे महत्त्व, संत परंपरा, धर्मसंस्कार आणि समाजजागृतीचे संदेश प्रभावीपणे मांडण्यात आले.

कथेच्या दुसऱ्या व चौथ्या दिवशी भगवान विष्णूंच्या विविध अवतारांचे महत्त्व, विशेषतः वामन अवतार आणि भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. “नंद के आनंद भयो, जय कन्हैयालाल की” या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. तसेच समर्थ रामदास स्वामी महाराजांना विष्णू सहस्त्रनामाच्या मंत्रोच्चारात जलाभिषेक करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यामुळे उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा दिव्य अनुभव लाभला.

कथा सप्ताहात दररोज भजन, कीर्तन, आरती, नामस्मरण व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत तसेच महिला मंडळींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कथा श्रवणाचा लाभ घेतला. समारोपाच्या दिवशी आयोजित महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. भोजन व्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात श्री व सौ. जोशी परिवार, श्री व सौ. कुलकर्णी यांच्यासह श्री लक्ष्मीकांत सबनीस, शिवकुमार दारुवाले, राजू सिलमवार, सिद्दीकी सर, प्रवीण बोरखडे, प्रा. पराग हासे, बलराज मडीलगेकर, कदम मामा, गोडसे काका आदींनी मोलाचे सहकार्य केले.

या कथा महोत्सवाच्या निमित्ताने अद्वैत कॉलनीतील नागरिकांची एकजूट, धार्मिक भावना आणि सामाजिक बांधिलकीचे सुंदर दर्शन घडले. “एकता, भक्ती आणि सेवा” यांचा आदर्श निर्माण करत अशा धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांमुळे सामाजिक सलोखा अधिक दृढ होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!