
पवना येथील अल्पभूधारक शेतकऱ्यावर संकटांचा डोंगर; पाच लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील पवना येथील अल्पभूधारक मागासवर्गीय शेतकरी बालाजी यादवराव राऊत यांच्या शेतातील राहते घर व आखाड्याला लागलेल्या भीषण आगीत संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, शेतीची अवजारे आणि रोख रक्कमेसह सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत दोन बैल गंभीररीत्या भाजल्याने शेतकरी कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.


तेलंगणा बॉर्डरला लागूल जंगलाच्या काठी वसलेल्या मौजे पवना शिवारातील गट क्रमांक ४९ मध्ये बालाजी राऊत यांचे शेत असून ते कुटुंबासह शेतातच वास्तव्यास असतात. मात्र १७ मेच्या रात्री कुटुंब गावातील घरी गेले असताना शेतातील घर व आखाड्याला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण घर व आखाडा आपल्या विळख्यात घेतला.



या आगीत घरात साठवून ठेवलेले ४ क्विंटल मका, ४ क्विंटल गहू, ४ क्विंटल ज्वारी, २ क्विंटल तूर, दोन मोटार पंप, दोन स्प्रिंकल सेट, बैलगाडी, जुनी मोटारसायकल, टिनपत्रे, शेतीची अवजारे, घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच जनावरांसाठी ठेवलेली वैरण जळून खाक झाली. विशेष म्हणजे घरात ठेवलेली सुमारे एक लाख रुपयांची रोख रक्कमही आगीत भस्मसात झाली. आगीत अडकलेल्या दोन बैलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचाराची गरज निर्माण झाली आहे.



या दुर्घटनेमुळे आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्याने केलेली संपूर्ण तयारी उद्ध्वस्त झाली आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या राऊत कुटुंबासमोर आता उदरनिर्वाहाचे गंभीर संकट उभे ठाकले असून शासनाने तातडीने सानुग्रह अनुदान व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे.



महसूल अधिकारी गैरहजर; कोतवालाने केला पंचनामा
दरम्यान, घटनेची माहिती मिळूनही संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांनी २१ मेपर्यंत घटनास्थळी भेट दिली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कोतवाल विशाल सावते यांनी पोलिस पाटील जाधव यांच्या उपस्थितीत घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अहवाल संबंधितांकडे सादर केला. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी नेमकी कोण पार पाडत आहे? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

