नांदेडच्या नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज रस्त्यावरील अतिक्रमणांवर महानगरपालिकेची धडक कारवाई

नांदेड| नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आज शहरातील मुख्य मार्गांपैकी एक असलेल्या नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. वाहतुकीस अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे हटवून परिसर मोकळा करण्यात आला.

सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नव्याने प्रस्तावित असून भूमी अभिलेख विभागाने दिलेल्या रेखांकनानुसार महानगरपालिका आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर या मोहिमेमुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याचबरोबर नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज रोडवरील मुख्य नैसर्गिक नाल्यावर झालेली अतिक्रमणेही हटवण्यात आली. बेकायदेशीर बांधकामांमुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळित होत असल्याने परिसरात पाणी साचण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक, दोन जेसीबी मशीन आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली.

या धडक मोहिमेमुळे नाल्याचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होणार असून वाहतूक कोंडीची समस्याही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले असून शहरातील इतर भागांतील अतिक्रमणांवरही अशीच कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!