
बिलोली, गोविंद मुंडकर| शनिवार दिनांक 16 सकाळी सुमारे १०:४५ वाजेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील अनुसया नगर भागाच्या पायथ्याशी शनिवारी सकाळी भीषण अपघात घडून एका सुमारे ४० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या रेतीच्या ट्रकने विठ्ठल लवटे (रा. अनुसया नगर, सगरोळी) यांना जोरदार धडक देत चिरडल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली असून, अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.


या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक अत्यंत वेगात होता आणि गावातील मुख्य रस्त्यावरून कोणतीही खबरदारी न बाळगता धावत होता. यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “हा अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेली घटना आहे,” असे मतही संतप्त नागरिकांनी व्यक्त केले.



अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या मृताच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदयद्रावक होता. “माझ्या विठ्ठलाला पुन्हा मिळवून द्या हो…” या शब्दांनी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले. अनेक दिवसांपासून विठ्ठल लवटे आपल्या आईसोबत राहत होते, अशी माहितीही समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सगरोळी गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, सगरोळीतील नागरिकांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त करत “हा आक्रोश उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर गेला आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे.



गावातील रस्त्यांवरून सुरू असलेली अवैध रेती वाहतूक, ट्रकचालकांचा बेफाम वेग आणि नियमांची पायमल्ली याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी कुंडलवाडी येथेही अशाच प्रकारे रेतीच्या ट्रकने जीव घेतल्याची घटना घडली होती आणि त्या प्रकरणाची चर्चा विधानसभेत झाली होती; मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही, ही वस्तुस्थिती आता पुन्हा समोर आली आहे.


या घटनेनंतर संबंधित ट्रक चालकावर कठोर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, गावातून जाणाऱ्या अवैध रेती वाहतुकीवर बंदी घालावी, ट्रकच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात तसेच दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशा मागण्या ग्रामस्थांकडून जोर धरत आहेत.
सगरोळीतील ही घटना केवळ अपघात म्हणून न पाहता प्रशासनाच्या निष्क्रियतेचा परिणाम म्हणून पाहिली जात असून, अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
