
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला असून, त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेत राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे.


मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. राज्यातील एकूण ९,८६,४४,४१३ मतदारांच्या तपशीलांची खातरजमा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. हे अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत.


या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून नियुक्त करण्यात येणारे ‘बूथ लेव्हल एजंट’ (BLA) देखील सहकार्य करणार आहेत. दुबार नावे, मृत व्यक्तींची नोंद वगळणे तसेच नव्या पात्र मतदारांची नोंदणी करणे, यावर या मोहिमेत विशेष भर दिला जाणार आहे.


सध्या सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेचा विचार करून या मोहिमेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू होऊन ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे.


महत्त्वाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
२० ते २९ जून २०२६ : बीएलओ प्रशिक्षण व पूर्वतयारी
३० जून ते २९ जुलै २०२६ : घरोघरी भेटी व माहिती संकलन
५ ऑगस्ट २०२६ : मसुदा मतदार यादी प्रसिद्ध
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ : दावे व हरकती नोंदविण्याचा कालावधी
७ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
भारत निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल एजंट नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह होण्यास मदत होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
