नांदेड तालुक्यात जनगणना 2027 च्या प्रत्यक्ष कामास उद्यापासून प्रारंभ

नांदेड| भारतीय जनगणना 2027 अंतर्गत घर यादी व घर गणना अभियानाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय, नांदेड अंतर्गत सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांचे अंतिम प्रशिक्षण शंकराव चव्हाण सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ग्रामीण भागातील प्रत्यक्ष जनगणना कार्यास उद्यापासून प्रारंभ होत असून प्रशासनाने त्यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे.

प्रशिक्षणादरम्यान जनगणना प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः “मांडणी दर्शक नकाशा” अचूक पद्धतीने तयार करणे, गावातील प्रत्येक घराची नोंद करणे तसेच घरांची क्रमवारी आणि भौगोलिक मांडणी याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती देण्यात आली.

याशिवाय केंद्र शासनाच्या “HLO App” चा वापर करून डिजिटल पद्धतीने माहिती नोंदविणे, माहिती अपलोड करणे, स्वगणना आयडी तपासणे आणि ऑनलाइन प्रक्रियेमधील अडचणी सोडविणे याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी Rahul Kardile यांनी प्रमुख उपस्थिती लावून प्रगणक व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन केले.

जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया असून प्रत्येक कर्मचाऱ्याने अचूकता, पारदर्शकता आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. शासनाच्या विविध योजना आणि विकास आराखड्यांचे नियोजन जनगणनेतील माहितीवर आधारित असल्याने प्रत्येक घरापर्यंत पोहोचून योग्य माहिती संकलित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी स्वगणना प्रक्रियेत शंभर टक्के यश संपादन करणाऱ्या वाडी करडेल आणि गुंडेगाव येथील प्रगणक व पर्यवेक्षकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. स्वगणना पूर्ण झाल्यामुळे प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र स्वगणना आयडी प्राप्त झाला असून त्यामुळे प्रत्यक्ष जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

तहसीलदार संजय वारकड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले, तर निवासी नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींनी जनगणना कार्य यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

नांदेड तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरू होत असलेल्या या जनगणना मोहिमेमुळे प्रशासनाला अचूक लोकसंख्यात्मक माहिती उपलब्ध होणार असून विकास योजनांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!