तळपत्या उन्हात ‘सुवर्णवर्षाव’ ! भोकर-हिमायतनगर महामार्गालगत बहाव्याचा मनमोहक बहर

निसर्गाची पावसाळ्याला हाक

हिमायतनगर/भोकर/नांदेड, अनिल मादसवार| वैशाखाच्या तळपत्या उन्हात जिथे माणूस सावलीच्या शोधात भटकतो, तिथे भोकर-हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गालगत राजवाडी ते सोमठाणा – टाकराळा शिवारातील जंगलकाठ मात्र सध्या ‘सुवर्णवर्षावाने’ उजळून निघाला आहे. बहाव्याच्या झाडांनी फुलांचा सोनेरी साज चढवत संपूर्ण परिसराला मोहक रुप दिले आहे.

रखरखत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पिवळ्याधमक फुलांनी लगडलेली झाडे पाहताना जणू निसर्गाने सूर्यकिरणांचाच वर्षाव जमिनीवर उतरवला आहे, असे दृश्य अनुभवायला मिळत आहे. पानगळ झालेल्या फांद्यांवर फुललेला हा बहावा प्रवाशांचे लक्ष वेधून घेत असून अनेकजण या निसर्गसोहळ्याला मोबाईल कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत.

ग्रामीण भागात बहाव्याचा बहर म्हणजे पावसाळ्याची चाहूल मानली जाते. एप्रिल-मे महिन्यात फुलणारा हा वृक्ष काही दिवस परिसराला आगळेवेगळे सौंदर्य बहाल करतो. बहाव्याच्या फुलांभोवती घिरट्या घालणाऱ्या मधमाशा, फुलपाखरे आणि पक्ष्यांमुळे परिसरात जिवंतपणा अधिक खुलून दिसत आहे.

oplus_10485792

आयुर्वेदात औषधी गुणधर्मांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बहाव्याला साहित्यिक आणि कवींनीही नेहमीच विशेष स्थान दिले आहे. उन्हाच्या झळांमध्येही बहरत राहणारा हा सुवर्णवृक्ष जणू संकटातही आशावाद टिकवून ठेवण्याचा संदेश देतो. सध्या भोकर-हिमायतनगर मार्गावरील हा बहाव्याचा सुवर्ण बहर प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असून, निसर्गप्रेमींना अक्षरशः खुणावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!