हिमायतनगरच्या रुक्मिणीनगरात भक्तिमय वातावरणात श्री सिद्ध हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा थाटात संपन्न

असंख्य भाविकांची उपस्थिती; महाप्रसादाचा घेतला लाभ

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर शहरातील रुक्मिणीनगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री सिद्ध हनुमान मंदिरात गुरुवार, दि. 14 रोजी भव्य हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी सकाळी 9 वाजता वैदिक मंत्रोच्चारात होम-हवन विधी पार पडला. पुरोहित गजानन वाळके गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे अध्यक्ष दिलीप पाटील लोहरेकर, सचिव प्रा. कागणे सर, कापसे सर, विकास पाटील तसेच सुनील दमकोडवार यांनी सपत्नीक पूजा विधी करून धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ केला.

श्री सिद्ध हनुमान मंदिरात गणपती, शिवलिंग, नंदी महादेव तसेच हनुमंतरायाच्या मूर्तींची विधिवत स्थापना करण्यात आली. या मंगल प्रसंगी शहरातील असंख्य भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

मंदिर परिसर “जय श्रीराम” आणि “हनुमान की जय” च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त संपूर्ण परिसरात भक्तिमय, मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नवीन मंदिर व श्रीमूर्ती मुळे रुक्मिणीनगर परिसरात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक बळ मिळणार असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!