मराठा आंदोलनातील लढवय्या दत्ता पाटील यांना दिलासा डॉ. अंकुश देवसरकरांनी स्वीकारली उपचाराची जबाबदारी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दत्ता सूर्यवंशी यांच्यातील संवाद पुन्हा चर्चेत

नांदेड, अनिल मादसवार | मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत राज्यभर चर्चेत आलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत असतानाच नांदेडमधून दिलासादायक बातमी समोर आली आहे. भगवती हॉस्पिटलचे संचालक व नांदेड महानगरपालिकेचे सदस्य डॉ. अंकुश देवसरकर यांनी दत्ता पाटील यांच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी स्वीकारत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे.

सततच्या आंदोलन, उपोषण आणि संघर्षामुळे दत्ता पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मदतीचे आवाहन सुरू होते. या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. देवसरकर यांनी तातडीने पुढाकार घेत आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि उपचार प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून मराठा समाजातून समाधान व्यक्त केले जात आहे.

यावेळी बोलताना डॉ. अंकुश देवसरकर म्हणाले की, “समाजासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे ही आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे. दत्ता पाटील यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही.”

दरम्यान, काही वर्षांपूर्वीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दत्ता पाटील यांच्यातील व्हिडिओ कॉल संवादाचा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील आश्वासनांची आठवण करून देत नागरिकांकडून सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. सोशल मीडियावर #Dattapatil आणि #EknathShinde हे हॅशटॅग ट्रेंड होत असून, “दत्ता पाटील यांना न्याय द्या” अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हडसणीसारख्या छोट्याशा गावातून मराठा आरक्षणासाठी आवाज उठवणारा हा लढवय्या आज शारीरिक आणि आर्थिक अडचणींशी संघर्ष करत आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येत मदतीचा हात द्यावा, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे. आता तरी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दत्ता पाटील यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणार का..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!