पुतळा सुशोभीकरणाच्या वादाने लोहा पालिकेत खळबळ; मुख्याधिकारी लाळगे दीर्घ रजेवर, संदीप भोळे यांच्याकडे प्रभारी पदभार

प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह; “कार्यक्षम मुख्याधिकारी द्या”ची मागणी जोरात
लोहा | लोहा नगरपालिकेत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळा सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादाने आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी दीर्घ रजा घेतल्याने त्यांच्या जागी कंधारचे मुख्याधिकारी संदीप भोळे यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे.

नगराध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या टीमकडून शहरात विविध विकासकामे सुरू असतानाच पुतळा सुशोभीकरणासंदर्भातील अर्धवट प्रशासकीय आदेशामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनावश्यक वाद निर्माण झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या वादामुळे नगरपालिकेवर मोर्चाही धडकला आणि वातावरण चांगलेच तापले.

टेंडर, निधी, नकाशाविना आदेश?
पुतळा सुशोभीकरणासंदर्भात कोणतीही स्पष्ट प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न करता संबंधित कंत्राटदाराच्या नावाने पत्र काढण्यात आल्याचा आरोप होत आहे. टेंडर प्रक्रिया, निधीची तरतूद, आराखडा किंवा अधिकृत मंजुरी याबाबत माहिती नसतानाच आदेश काढल्याने गैरसमज वाढल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणामुळे आ. चिखलीकर आणि प्रा. धोंडे यांच्यातही राजकीय विसंवाद निर्माण झाल्याची चर्चा असून, त्याचेच रूपांतर आंदोलन आणि मोर्चामध्ये झाल्याचे सांगितले जात आहे.

मोर्चामुळे प्रशासन हादरले
प्रा. धोंडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर काढण्यात आलेल्या मोर्चात माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास गीते, भाजपा ओबीसी दक्षिण जिल्हाध्यक्ष उत्तम चव्हाण यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रभारी मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी निवेदन स्वीकारले.

मुख्याधिकाऱ्यांवर समन्वयाच्या अभावाचे आरोप
मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये कधीच योग्य समन्वय नव्हता, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. कार्यालयीन कामकाजात सातत्य नसणे, कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील दुरावा, प्रलंबित देयके, निवडणूक मानधन रखडणे अशा अनेक मुद्द्यांवरून नाराजी वाढत गेल्याचे समोर येत आहे. पालिका निवडणुकीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन अद्याप थकित असल्याची बाबही पुढे आली आहे. तसेच काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांसोबतचे वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याचे सांगितले जाते.

“आमच्यात भांडण लावता काय?”
महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमावेळी आमदार चिखलीकर यांनी मुख्याधिकारी लाळगे यांची खरडपट्टी काढल्याची माहिती समोर आली आहे. नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख आणि काही नगरसेवकांनीही “आमच्यात भांडण लावता काय?” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी चूक मान्य केल्याची चर्चा असून, त्यांनी तत्काळ दीर्घ रजा घेतल्याचे सांगितले जात आहे.

प्रशासनात सुधारणा कधी?
शहरातील नागरिकांच्या अपेक्षा वाढत असताना प्रशासनातील ढिसाळ कारभार, अधिकारी-कर्मचारी समन्वयाचा अभाव आणि विकासकामांमधील विलंब यामुळे नाराजी वाढत आहे. नगराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवून कार्यक्षम यंत्रणा उभी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!