हिमायतनगर/भोकर (प्रतिनिधी) एकीकडे खड्ड्यांनी भरलेला रस्ता आणि दुसरीकडे सुरूच असलेली टोल वसुली… यामुळे वाहनधारकांचा संताप शिगेला पोहोचला आहे. सरसम म्हसोबा नाण्यापासून पुढे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी खोल खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक बनला आहे. अपघातांचा धोका वाढला असतानाही संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचे चित्र आहे.


वाहनधारकांच्या मते, रस्त्याची दुरुस्ती न करता टोल वसुली सुरू ठेवणे हा सरळसरळ अन्याय आहे. “सुविधा शून्य, शुल्क पूर्ण” अशी परिस्थिती निर्माण झाली असून, रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.


दरम्यान, भोकर–हिमायतनगर (१६१ ए) राष्ट्रीय महामार्गावर आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. रुंदीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली; मात्र त्यानंतरची वृक्षलागवड आणि संगोपन पूर्णपणे फसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, संपूर्ण महामार्गावर सावलीच नाहीशी झाली आहे.


पूर्वी दुतर्फा हिरवीगार झाडे असल्याने प्रवाशांना उन्हाळ्यात दिलासा मिळत होता. मात्र आज परिस्थिती उलट झाली असून, कडाक्याच्या उन्हात प्रवाशांना सावलीशिवाय थांबावे लागत आहे. वाढत्या तापमानात ही बाब अधिकच त्रासदायक ठरत आहे.


विकासाच्या नावाखाली रस्ते रुंद झाले, पण पर्यावरणाचा बळी गेला, अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत. वृक्षलागवडीची जबाबदारी कंत्राटदार व संबंधित विभागावर असतानाही पाच-सहा वर्षांत एकही झाड उभे राहिले नाही, ही बाब धक्कादायक असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
“पहिले रस्ता दुरुस्ती आणि वृक्षलागवड… नंतरच टोल वसुली करा !”
रस्ता तात्काळ दुरुस्त करून खड्डे बुजवावेत, तसेच महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करावे; अन्यथा टोलविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वाडगावकर यांच्यासह स्थानिक नागरिक व संघटनांनी दिला आहे.
