
कंधार (सचिन मोरे) खताने भरलेला भरधाव वेगात लोह्या कडून कंधार कडे येणाऱ्या ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने वेगवान ट्रक महाराणा प्रताप चौकातील गतिरोधकावर धडकला. त्यामुळे शेकडो नागरिकांचे प्राण वाचले. मोठा अनर्थ टळला या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीती वातावरण निर्माण झाले.


याबाबत प्रत्यक्ष दर्शनी नागरिकाकडून मिळालेली माहिती अशी की, ५ मे रोजी दुपारी तीन ते चार च्या दरम्यान लोह्याकडून भरधाव वेगात खतांनी भरलेला ट्रक क्रमांक एमएच १२ एनएक्स १९६९ या क्रमांकाचा खतांनी भरलेला ट्रक कंधार कडे येत असताना अचानक ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे ट्रक चालकाच्या लक्षात आले. त्याने प्रसंग अवधान राखत ट्रकवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असताना दगडसांगवी हून कंधारकडे परत येणारी बस क्रमांक एमएच २० बीएल २०४८ या बस ची महाराणा प्रताप चौकामध्ये समोरासमोर टक्कर होताहोता टळली.


ट्रक चालकाने प्रसंग अवधान राखत बसला कट मारून ट्रक चौकातील गतिरोधकावर घातला. त्यामुळे एसटी बसमधील प्रवाशांचा जीव बाल बाल बचावला व मुख्य चौकात होणारा मोठा अनर्थ टळला.हा फिल्मी स्टाईल थरार कंधार मध्ये घडल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक हे शहरातील व्यापाराचे मुख्य केंद्र असून या ठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. या ठिकाणी परिसरातील नागरी आपली कामे घेऊन तालुक्यावर येत असतात. याच ठिकाणी यापूर्वी देखील दोन ते तीन वेळेस मोठे अपघात घडल्याच्या घटना झालेले आहेत.



हा भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाने मोठ्या कौशल्याने ट्रक गतिरोधकावर घातला अन्यथा अनेक नागरिक या ट्रक खाली चिरडल्या गेले असते. लाखोंचे नुकसान झाले असते. या घटनेमुळे मोठा अनर्थ टळला. चौकातील व्यापारी बंधूंनी, हातगाडे, फळ विक्रेते, ऑटो चालक यांनी ईश्वरांचे आभार मानले. हे वृत्त लिहीपर्यंत कंधार पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता.
