
राज्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट सुरू असून नांदेडसह अनेक भागांमध्ये तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात (Heat Stroke) होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही एक गंभीर वैद्यकीय अवस्था असून वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
उष्माघात म्हणजे काय?
उष्माघात ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते आणि शरीराला स्वतःचे तापमान नियंत्रित करता येत नाही. सामान्यतः शरीर घामाद्वारे थंड होते, मात्र उष्माघातात ही प्रक्रिया अयशस्वी ठरते.



उष्माघाताची लक्षणे



उष्माघात झालेल्या व्यक्तीत खालील लक्षणे दिसून येतात:


- त्वचा लाल, गरम व कोरडी होणे
- श्वास घेण्यास त्रास
- चक्कर येणे, थकवा
- मळमळ, उलट्या
- तीव्र डोकेदुखी
- हृदयाचे ठोके वेगाने वाढणे
- गोंधळ, चिडचिडेपणा
प्रमुख कारणे
- उन्हात दीर्घकाळ राहणे
- पाणी कमी पिणे (डिहायड्रेशन)
- दुपारच्या वेळेत कष्टाची कामे करणे
- मद्य व कॅफिनचे जास्त सेवन
- उन्हात व्यायाम करणे
जास्त धोका असलेले गट
- लहान मुले व नवजात बालके
- वृद्ध व्यक्ती
- गरोदर महिला
- बाहेर काम करणारे कामगार
- लठ्ठ व्यक्ती
- हृदय, मधुमेह, किडनी किंवा फुफ्फुसांचे रुग्ण
प्रथमोपचार
उष्माघात झाल्यास त्वरित:


- रुग्णाला सावलीत किंवा थंड जागी आणा
- कपडे सैल करा
- आडवे झोपवून पाय उंच ठेवा
- ओल्या कापडाने शरीर थंड करा
- गार पाण्याच्या पिशव्या काखेत/मानेला ठेवा
- पाणी, साखर-मीठ द्रावण किंवा नारळपाणी द्या
- रुग्ण बेशुद्ध असल्यास तात्काळ रुग्णालयात हलवा
- १०८ वर कॉल करून ॲम्बुलन्स मागवा
बचावासाठी उपाय
- भरपूर पाणी प्या
- फळे, रस, पालेभाज्या आहारात घ्या
- दुपारी १२ ते ४ बाहेर जाणे टाळा
- हलके व सैल कपडे वापरा
- टोपी, छत्री किंवा रुमाल वापरा
- मद्य व कॅफिन टाळा
- उपाशीपोटी बाहेर पडू नका
घर थंड ठेवण्यासाठी उपाय
- जाड पडदे वापरून सूर्यप्रकाश रोखा
- सायंकाळी खिडक्या उघडा
- झाडे खिडकीजवळ ठेवा
- LED दिवे वापरा
- छतावर पांढरा रंग द्या
- शेड नेटचा वापर करा
दरवर्षी जगभरात सुमारे २५,००० लोकांचा मृत्यू उष्माघातामुळे होतो. भारतात हा आकडा १५०० ते २००० दरम्यान असून महाराष्ट्रात १५० ते २०० मृत्यू नोंदवले जातात. उष्माघात टाळणे शक्य आहे. योग्य काळजी, पुरेसे पाणी आणि सावधगिरी बाळगल्यास आपण या जीवघेण्या परिस्थितीपासून स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करू शकतो.“सावधगिरी हाच सर्वोत्तम बचाव आहे.”
✍️ संकलन : सत्यजीत टिप्रेसवार, आरोग्य निरीक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर
