
नांदेड,गोविंद मुंडकर | विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून तेच त्यांच्या आयुष्याची भक्कम पायाभरणी करते, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केला. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नांदेड आणि नांदेड जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळेत ते बोलत होते.


श्री शंकरराव चव्हाण सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, शिक्षण उपसंचालक दीपक चव्हाण (लातूर), डायटचे प्राचार्य अमोल निळेकर, शिक्षणाधिकारी माधव सलगर, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, तसेच माध्यमिक उपशिक्षणाधिकारी अवधूत गंजेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.


जिल्हाधिकारी कर्डिले यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शालेय परीक्षा स्पर्धात्मक परीक्षांच्या धर्तीवर घेण्याचे आवाहन केले. फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच नियोजनबद्ध तयारी करावी, असे त्यांनी सांगितले. यंदा जिल्ह्याचा निकाल १५ टक्क्यांनी घटला असल्याने तो उंचावण्यासाठी शाळा, शिक्षक आणि पालकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.


प्रत्येक शाळेत परिपाठानंतर किमान दहा मिनिटे वर्तमानपत्र वाचनाचा उपक्रम राबवून त्याचा दुसऱ्या दिवशी आढावा घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. तसेच शाळांमध्ये १०० टक्के विद्यार्थी उपस्थिती राखण्यावर भर देण्याचेही त्यांनी सांगितले. पालकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेत शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये नियमित पाठवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


नांदेड जिल्हा शिक्षण मंडळाने तयार केलेली शालेय दिनदर्शिका ही शाळांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगून त्यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. कार्यशाळेत दीपक चव्हाण आणि अमोल निळेकर यांनीही आपले विचार मांडले. यावेळी नांदेड स्कॉलर परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा आणि संबंधित मुख्याध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शालेय बॅग आणि शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, शेकडो मुख्याध्यापक व प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी केले, सूत्रसंचालन संजय शीप्परकर यांनी केले, तर आभार वसंत दिग्रसकर यांनी मानले.
