
नांदेड /अंबाजोगाई (प्रतिनिधी) मराठवाडा मुक्ती संग्रामातील अग्रणी नेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी प्राचार्य म्हणून कार्य केलेल्या योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे मराठवाडा मुक्ती चळवळ आणि जनजागरण उपक्रमाचे समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर आणि डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशन चे संस्थापक बापूराव गजभारे यांचा संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.



हा सन्मान सोहळा योगेश्वरी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांच्या हस्ते रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी संपन्न झाला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कार्यक्रमादरम्यान मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासाची आठवण जागवून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. गोविंद मुंडकर आणि बापूराव गजभारे यांनी केलेल्या जनजागरणात्मक कार्याचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला. यानंतर योगेश्वरी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या सैनिक शाळेची पाहणीही मान्यवरांनी केली.


दरम्यान, हैदराबाद मुक्तिसंग्राम स्मृतीस्थळ तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतींशी संबंधित स्थळांची पाहणी करून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासाला अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्मृती जागृत ठेवण्यासह नव्या पिढीत इतिहासाविषयी जागरूकता निर्माण होण्यास हातभार लागणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


