रेती वसुली प्रकरण पेटले; महाराष्ट्र दिनीच आमरण उपोषण सुरू

छत्रपती संभाजीनगर/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांकडून रेतीसाठी प्रत्येकी ५ हजार रुपये घेतल्याच्या आरोपावरून सुरू असलेला वाद आता तीव्र झाला असून, १ मे महाराष्ट्र दिनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. तक्रारदार अशोक रामराव हिवराळे आणि साईनाथ गंगाधर पांढरे यांनी आंदोलनाला प्रारंभ केला आहे.

बिलोली तालुक्यातील सगरोळी, येजगी, गंजगाव, हुणगुंदा व बोळेगाव येथील रेती घाटांवर अवैध उत्खनन व घरकुल लाभार्थ्यांकडून बेकायदेशीर वसुली होत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. या प्रकरणी अनेक वेळा वरिष्ठ स्तरावर तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये संबंधित उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार गजानन शिंदे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई, अवैध संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी, तसेच रेती घाट मालक विजयकुमार अग्रोया यांच्यावर गुन्हा नोंदवून अनामत रक्कम जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच चौकशी प्रक्रियेत अनियमितता केल्याचा आरोप करत निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदारांच्या मते, विधीमंडळ अंदाज समितीने स्थळ भेट देऊन गंभीर अनियमितता निदर्शनास आणून दिल्यानंतरही प्रशासनाकडून कारवाई टाळली जात आहे. दरम्यान, रेती घाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असून JCB व पोकलँडच्या सहाय्याने दिवस-रात्र वाहतूक सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आंदोलनामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, परिस्थिती चिघळू नये यासाठी तातडीने तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!