हरडफ येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी ; खीरदान व भोजनदानाने धम्ममय वातावरण

हदगांव| तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हरडफ येथे बुद्ध पौर्णिमा अत्यंत उत्साहात आणि बुद्धमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावर्षीच्या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिला मंडळाचा सक्रिय सहभाग आणि त्यांच्या वतीने पंचशील ध्वजारोहण आणि त्रिसरण पंचशीला घेण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता करण्यात आली.

भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पंचशील ध्वजाचे अनावरणकरण्यात आले. यावेळी उपस्थित उपासक-उपासिकांनी सामूहिक बुद्ध वंदना, धम्म वंदना आणि संघ वंदना ग्रहण केली या सोहळ्यामध्ये महिला मंडळाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. सर्व महिलांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून ‘धम्म ज्योती बुद्धविहारा’कडे प्रयाण केले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमयी झाले होते.वंदनेनंतर महिला मंडळाच्या वतीने उपस्थित नागरिकांना खीरवाटप (खीरदान) करण्यात आले.

दिवसभर विहारामध्ये महिलांच्या वतीने बुद्ध आणि त्यांचा धम्म’या ग्रंथाचे सामूहिक वाचन करण्यात आले. बुद्धांचे विचार घराघरात पोहोचावेत, हा यामागचा मुख्य उद्देश होता. गावातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या दारापुढे आकर्षक रांगोळी काढून बुद्ध पौर्णिमेचे आणि तथागतांच्या विचारांचे स्वागत केले.सायंकाळी सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि जमा झालेल्या धम्मदानातून भव्य भोजनदान आयोजन करण्यात आले होते. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या तत्त्वाचे पालन करत गावातील सर्व नागरिकांनी या खीर दानाचा व भोजन दानाचा लाभ घेतला.

बुद्ध पौर्णिमा हा दिवस बुद्धांच्या जीवनातील तीन महत्त्वाच्या घटनांचा (जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण) त्रिवेणी संगम मानला जातो. या पवित्र दिनाचे औचित्य साधून हरडफवासीयांनी एकतेचा आणि शांततेचा संदेश दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्म ज्योती बुद्धविहार समिती आणि हरडफ येथील समस्त महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांनी या शिस्तबद्ध आयोजनाचे विशेष कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!