
हदगाव, गौतम वाठोरे| तालुक्यातील अंबाळा परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने वऱ्हाडातील घोडीला दिलेल्या जोरदार धडकेत घोडीचा जागीच मृत्यू झाला असून, घोडी सांभाळणारा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना ३० एप्रिल रोजी दुपारी घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, अंबाळा येथे विवाह सोहळ्यासाठी सजवलेली घोडी वऱ्हाडाच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या अनियंत्रित ट्रकने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, घोडीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात घोडीची देखरेख करणारा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी भरधाव वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच चालकांच्या निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


दरम्यान, या प्रकरणी संबंधित ट्रकचालकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


