
हिमायतनगर/नांदेड| राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात डिजिटल मीडिया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल Nanded24News चे संपादक गोविंद गोडसेलवार यांना “डिजिटल मीडिया पुरस्कार 2026” प्रदान करण्यात आला.


तळागाळातील गोरगरीब, वंचित व शोषित घटकांना लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण व प्रभावी कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. त्यांच्या पत्रकारितेमुळे अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फुटून जनतेच्या समस्यांना योग्य व्यासपीठ मिळाले आहे. तर गरजू गोर गरीब विद्यार्थी यांना समाजाचे पाठबळ मिळावे यासाठी त्यांनी लेखणीतून आवाज उठवत शिक्षणासाठी दानशूर व्यक्तीकडून मदत मिळून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत.


हा पुरस्कार राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे तसेच केंद्रीय व राज्य नियोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे गोडसेलवार यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून पत्रकारिता क्षेत्रात हा अभिमानास्पद क्षण मानला जात आहे.


त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आजी – माजी खासदार, आमदार, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, मित्रमंडळ, हिमायतनगर येथील पत्रकार बांधवानी अभिनंदन केलं आहे.


