
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील योगदानासह शैक्षणिक कार्याचा गौरव
हिमायतनगर, प्रतिनिधी| हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे महानायक, थोर स्वातंत्र्यसेनानी आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती हु.ज.पा. महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. एम.पी. गुंडाळे होते, तर इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. वसंत कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. वसंत कदम यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. “स्वामी रामानंद तीर्थ यांची जन्मभूमी कर्नाटक असली, तरी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश ही त्यांची प्रमुख कर्मभूमी होती. निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्ध त्यांनी संघर्ष उभारून जनतेला संघटित केले. त्यांचा संन्यास हा समाजापासून दूर जाणारा नव्हता, तर समाजात राहून कर्म करण्याचा होता,” असे त्यांनी सांगितले.


स्वामीजींच्या शैक्षणिक योगदानाचा उल्लेख करताना त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील हिप्परगा येथे स्वामी रामानंद तीर्थ यांनी राष्ट्रीय शाळा सुरू करून शिक्षणाच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य केल्याचे सांगितले. त्यांच्या महान कार्याची कृतज्ञता म्हणून नांदेड येथील विद्यापीठाला ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ हे नाव देण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.


स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती साधावी, तसेच समाजहिताची जाणीव ठेवून कार्य करावे, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सविता बोंढारे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
