
सर्वरोग निदान शिबिरात हजारो रुग्णांची तपासणी; ४१० रुग्णांची पुढील उपचारासाठी निवड


हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून हिमायतनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोग निदान व उपचार शिबिराला हजारो रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. ४) श्री परमेश्वर मंदिर परिसरात हे भव्य आरोग्य शिबिर पार पडले.


शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक या शिबिरासाठी दाखल झाले होते. विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. विविध आजारांवरील उपचार, वैद्यकीय सल्ला तसेच प्राथमिक उपचाराची सुविधा यावेळी मोफत उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या शहरातील तज्ज्ञ वैद्यकीय सेवा घेणे शक्य नसलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला.



४१० रुग्णांची पुढील उपचारासाठी निवड – शिबिरात हजारो रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, विविध गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या ४१० रुग्णांची पुढील उपचारासाठी निवड करण्यात आली आहे. या रुग्णांना आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे.
निवड झालेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात जाणे सुलभ व्हावे, यासाठी ७, ९ आणि १३ ऑक्टोबर रोजी श्री परमेश्वर मंदिर परिसरातून विशेष रुग्णवाहिका व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना पुढील उपचारासाठी ये-जा करण्याची अडचण भासणार नाही.



तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी – शिबिरात विविध आजारांशी संबंधित तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय पथकाने रुग्णांची तपासणी केली. आरोग्याच्या तक्रारींबाबत डॉक्टरांनी रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन केले. अनेक रुग्णांना प्राथमिक उपचार व पुढील उपचाराबाबत सल्ला देण्यात आला. विशेषतः गंभीर स्वरूपाच्या आजारांची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांची पुढील उपचारासाठी निवड करण्यात आल्याने या शिबिराचे महत्त्व अधोरेखित झाले.

ग्रामीण नागरिकांचा मोठा प्रतिसाद – आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून आयोजित या आरोग्य उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि वैद्यकीय सेवा मोफत मिळाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय पथक, स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. सकाळपासूनच श्री परमेश्वर मंदिर परिसरात रुग्णांची मोठी गर्दी झाली होती. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबांना आरोग्य उपचारांचा खर्च परवडणे कठीण होत असताना, मोफत तपासणी, उपचार व पुढील उपचारासाठीची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. आरोग्यसेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू नागरिकांपर्यंत थेट पोहोचण्याचा हा उपक्रम ठरला.
