शहापूरच्या ‘आपला गणेश मंडळा’ला तृतीय पारितोषिक

डीजे, नशा, गुलाल आणि जुगारमुक्त गणेशोत्सव; सामाजिक जनजागृतीसह उत्कृष्ट शिस्तीची दखल

शहापूर, प्रतिनिधी| गणेशोत्सवात उत्कृष्ट देखावे, स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक जनजागृतीसह शांततेत उत्सव साजरा केल्याबद्दल शहापूर येथील आपला गणेश मंडळाला देगलूर पोलिसांच्या वतीने तृतीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. देगलूर तालुक्यातील सुमारे ३०० गणेश मंडळांमधून आपला गणेश मंडळाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

देगलूर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळगट यांच्या हस्ते मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

आपला गणेश मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात डीजे मुक्त, नशामुक्त, गुलालमुक्त आणि जुगारमुक्त वातावरण ठेवण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार उत्सव काळात उत्तम शिस्त व स्वच्छता राखत आकर्षक देखावे सादर करण्यात आले. तसेच विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करून नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश देण्यात आला.

गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात आले. त्यामुळे उत्सव आणि विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात मंडळाने सहकार्य केले.

विशेषतः डीजे, नशा, गुलाल आणि जुगाराला फाटा देत सामाजिक सलोखा व शांततेला प्राधान्य देणाऱ्या मंडळाच्या कार्याची पोलिस प्रशासनाने दखल घेतली. उत्कृष्ट देखावे, स्वच्छता, शिस्त, सामाजिक जनजागृती आणि पोलिस प्रशासनाला केलेल्या सहकार्यामुळेच आपला गणेश मंडळाला तृतीय पारितोषिक मिळाले, अशी भावना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या गौरवामुळे शहापूर गावाच्या नावलौकिकात भर पडली असून, मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!