समाजसेवेचा अखंड दीप : नवनिहालसिंग जहागीरदार यांची प्रेरणादायी वाटचाल

नांदेड जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांनी आपल्या कार्याने वेगळी छाप उमटवली, अशा व्यक्तिमत्त्वांमध्ये नवनिहालसिंग जहागीरदार यांचे नाव आदराने घेतले जाते. स्वातंत्र्यसैनिक गुलाबसिंग जहागीरदार यांचा वारसा लाभलेल्या या कर्तृत्ववान व्यक्तीने गेली दोन दशके समाजसेवेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवत जनतेच्या जीवनात प्रकाश निर्माण केला आहे.

‘नवज्योत फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देशप्रेम, शिक्षण, संस्कार आणि संस्कृती जपण्याचे महान कार्य हाती घेतले आहे. या संस्थेने केवळ विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली नाही, तर त्यांच्यात मूल्याधिष्ठित विचारांची पेरणी केली. समाजाच्या जडणघडणीत शिक्षणाची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे जाणून त्यांनी आपल्या कार्यातून त्या विचाराला मूर्त रूप दिले आहे.

नांदेडमधील नामांकित अशा नांदेड एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी प्रभावी नेतृत्व दाखवले आहे. पीपल्स हायस्कूलच्या शैक्षणिक प्रगतीत यांचा मोठा वाटा आहे एक दशकापासून त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध शालेय उपक्रम राबवून शाळेच्या उन्नतीसाठी विविध प्रयत्न चालवले.त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये संचालक म्हणून काम करताना त्यांनी व्यवस्थापन कौशल्य आणि दूरदृष्टीचे दर्शन घडवले आहे.

अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणामुळे त्यांच्या निर्णयक्षमतेला बळ मिळाले असून, विकासाभिमुख दृष्टिकोनातून त्यांनी विविध उपक्रमांना दिशा दिली आहे. केवळ शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रापुरतेच नव्हे, तर सांस्कृतिक अंगानेही त्यांचे व्यक्तिमत्त्व तितकेच समृद्ध आहे. तबलावादनात प्रावीण्य मिळवलेल्या जहागीरदार यांनी विद्यार्थी दशेतच राज्यस्तरीय कार्यक्रमांत सहभाग नोंदवून आपली कला सादर केली. त्यांच्या तालबद्ध स्पर्शातून केवळ संगीत नव्हे, तर जीवनातील समतोल आणि सौंदर्य व्यक्त होते.

धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. गुरुद्वाराशी निगडित विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेत समाजातील ऐक्य आणि श्रद्धा दृढ करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्यातून धर्म आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम दिसून येतो. गोदावरी नदीच्या जलशुद्धीकरणासाठी त्यांनी घेतलेली धडपड ही त्यांच्या कार्याची एक महत्त्वपूर्ण ओळख ठरली आहे.

मराठवाड्यातील समाजधुरीनांना जागृत करणारे हे कार्य त्यांनी केवळ जनजागृतीपुरते मर्यादित ठेवले नाही, तर न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून शासन-प्रशासनालाही जबाबदारीची जाणीव करून दिली. पर्यावरण संरक्षणाच्या या लढ्यात त्यांनी वर्तमान आणि भविष्यासाठी आदर्श निर्माण केला आहे.

शीख समाजातील सामूहिक विवाह परंपरेला बळ देत त्यांनी स्वतःच्या पाच भगिनींचा विवाह सामूहिक सोहळ्यात करून एक अनोखा आदर्श घालून दिला. समाजातील ऐक्य, साधेपणा आणि परस्पर सहकार्याची भावना जोपासणारा हा उपक्रम त्यांनी कृतीतून सिद्ध केला. त्यांच्या या कार्याचा प्रभाव इतका खोलवर रुजला की, गुरुद्वारा बोर्डानेही ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचा संकल्प केला.

नवनिहालसिंग जहागीरदार यांची वाटचाल म्हणजे समर्पण, संवेदनशीलता आणि दूरदृष्टी यांचा संगम होय. त्यांनी आपल्या कृतीतून समाजसेवा ही केवळ कर्तव्य नसून ती एक जीवनशैली आहे, हे अधोरेखित केले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन अनेक युवक समाजकार्यात पुढे येत आहेत, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.

अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने आपल्या कार्यातून नांदेड जिल्ह्याच्या विकासात मोलाचा वाटा उचलला असून, त्यांच्या कार्याचा सुवास समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात दरवळत राहील, यात शंका नाही.

संकल्पना: जीवनसिंघ बेदी, शब्दांकन: गोविंद मुंडकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!