पांदण रस्त्यासह विविध योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना – तहसीलदार विठ्ठल परळीकर

लोहा/माळाकोळी| शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी भेडसावणाऱ्या रस्त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महास्वराज अभियानांतर्गत पांदण रस्त्यांचे प्रस्ताव मागविण्यात येत असून त्यांना मंजुरी दिली जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली.

माळाकोळी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल (राजस्व) अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नायब तहसीलदार अशोक मोकले, श्री पाठक, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती वानखेडे, उपअभियंता (पाणीपुरवठा) दीपक बनसोडे, ग्राम महसूल अधिकारी भुमेश्वर विभुते, कनिष्ठ अभियंता श्री कराड, सरपंच जनार्धन तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रमुनी मस्के, परमेश्वर मुरकुटे, गणपत तिडके, पांडुरंग नागरगोजे, हनमंतराव खेडकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

परळीकर म्हणाले की, शेती, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या योजनांची माहिती देणे, त्यांच्या अडचणी सोडविणे आणि योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा उद्देश आहे. लोहा तालुक्यात ७ मार्च ते ८ मे दरम्यान सर्कलनिहाय समाधान शिबिरे आयोजित करण्यात येत असून माळाकोळी येथील हे पाचवे शिबिर आहे.

या शिबिरात २५ शिधापत्रिका धारकांना शिधापत्रिकांचे, १० नागरिकांना उत्पन्न प्रमाणपत्रांचे तसेच ३५ संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

पाणीपुरवठा व रेल्वे प्रश्नांवरही चर्चा

शिबिरादरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तहसीलदार परळीकर यांनी पाणीपुरवठा योजनांबाबत संबंधित विभागाशी समन्वय साधून त्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच माळाकोळी येथून रेल्वे मार्गाबाबत नागरिकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याची ग्वाही दिली. यावेळी पांदण रस्ते, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमितीकरण, जनगणना २०२६, एसआयआर परीक्षण व जमीन वर्गीकरण आदी विषयांवरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!