
अर्धापूर| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून सर्व समाजांचे प्रेरणास्थान आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी केले.


येथील डॉ. आंबेडकर नगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. राम वाघमारे बोलत होते. कार्यक्रमास विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपल्या भाषणात डॉ. वाघमारे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या समता, शिक्षण आणि मानवतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली. भीमजयंती साजरी करताना केवळ एक दिवसापुरता उत्साह न ठेवता तो वर्षभर टिकवण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच वाचन संस्कृती वाढवून समाजप्रबोधनासाठी पुढाकार घेण्याचेही त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाची सुरुवात प्रज्ञा बुद्ध विहार येथे पंचशील ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर गाथा पठनाचा कार्यक्रम पार पडला. जयंती मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले असून मोठ्या संख्येने नागरिक, महिला व पुरुष उपस्थित होते.


