
नांदेड| उन्हाळ्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची घंटा) हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांनी नियमित पाणी प्यावे यासाठी शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा ‘वॉटर बेल’ वाजविण्याचा निर्णय घेतला होता. त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने जवळा येथील शाळेने पुढाकार घेत हा उपक्रम प्रत्यक्षात आणला आहे.


मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी शाळेच्या वेळापत्रकात सकाळी 8.30, 9.30 आणि 10.30 वाजता पाणी पिण्यासाठी वेळ निश्चित केला आहे. या वेळी सर्व विद्यार्थी एकत्र येऊन पाणी पितात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय लागण्यास मदत होत आहे.


उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता झाल्यास थकवा, चिडचिड, तसेच इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अनेक विद्यार्थी खेळाच्या नादात पाणी पिणे टाळतात, ही बाब लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे.


शाळेला ग्रामपंचायतीकडून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह वापरण्याचीही मुभा देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग नोंदविला आहे.
