
नांदेड (प्रतिनिधी) कौटुंबिक वादातून संतप्त झालेल्या सासरच्यांनी जावयाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बळीरामपूर (ता. नांदेड) येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सासू आणि दोन मेहुण्यांना ताब्यात घेतले आहे.


मृतक विजय साहेबराव शिंदे (वय ३०, रा. तेलंगणा) याचा काही दिवसांपूर्वी बळीरामपूर येथील युवतीसोबत विवाह झाला होता. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असला, तरी विजय शिंदे याचे दारूचे व्यसन आणि पत्नीवर होणारी मारहाण यामुळे घरात सतत वाद होत होते. याच कारणावरून काही दिवसांपूर्वी सासरच्यांसोबत त्याचा वाद झाला होता.


शनिवारी संध्याकाळी पुन्हा तो सासरवाडीत आला असता वाद चिघळला. यानंतर सासू आणि दोन मेहुण्यांनी संतापाच्या भरात त्याला गावाबाहेरील धनेगाव शिवारात नेले. तेथे आधी त्याला दारू पाजण्यात आली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.


घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, संशयित सासू आणि दोन्ही मेहुण्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.


दरम्यान, मृतक विजय शिंदे याच्यावर तेलंगणा राज्यात एका मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे. त्याच मुलीसोबत त्याने नंतर विवाह केल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या २४ तासांत घडलेल्या दुसऱ्या खूनप्रकरणामुळे शहर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
