जालना–नांदेड समृद्धी महामार्गग्रस्त १२ गावांतील शेतकऱ्यांची २५ एप्रिलला बाभुळगाव फाट्यावर निर्णायक बैठक

नवीन नांदेड, प्रतिनिधी | जालना–नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे बाधित झालेल्या १२ गावांतील शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक दि. २५ एप्रिल रोजी बाभुळगाव फाटा (ता. नांदेड) येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा व रणनीती ठरविण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कृती समितीने दिली आहे.

नांदेड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना शासनाने अत्यंत कमी दराने जमीन घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मागील चार वर्षांपासून विविध मागण्यांसाठी शेतकरी पाठपुरावा करत असले तरी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, बागायती व शहरालगत असलेल्या सुपीक जमिनींचेही कवडीमोल दराने संपादन करण्यात आले. याशिवाय आता इंटरचेंज व इतर कामांसाठी पुन्हा संयुक्त मोजणीच्या नोटिसा बजावण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. बारा टक्के व्याज, योग्य मोबदला, प्रलंबित मागण्या तसेच नव्या संयुक्त मोजणी प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता उस्माननगर रोडवरील बाभुळगाव फाटा येथे ही बैठक होणार आहे.

या बैठकीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दासराव हंबर्डे, अशोक मोरे, माजिद शेख, दीपक पाटील, परदेशी बाबूजी, संतोष मस्के, हरीश हंबर्डे, तुळशीराम गिरे, विश्वासराव देशमुख, माधव कदम तसेच शेतकरी कृती समिती, नांदेड यांनी केले आहे. समृद्धी महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!