
नांदेड | दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत नांदेड विभागाने वित्तीय वर्ष 2025–26 मध्ये मालवाहतूक कार्यक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून पूर्णा रेल्वे डिपो येथे वॅगन तपासण्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढवण्यात आली आहे.


अधिकृत माहितीनुसार, 2024–25 मध्ये पूर्णा डिपोवर एकूण 248 वॅगन तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत 2025–26 मध्ये ही संख्या वाढून 282 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, प्रीमियम वॅगन तपासण्यांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी 55 प्रीमियम तपासण्या झाल्या होत्या, तर यावर्षी त्या तब्बल 158 पर्यंत वाढल्या आहेत.


प्रीमियम तपासण्या ही जलद आणि सखोल तपासणी प्रक्रिया मानली जाते. यामुळे वॅगन कमी वेळात सेवेसाठी तयार होतात तसेच सुरक्षा व गुणवत्ता मानकेही उच्च पातळीवर राखली जातात. या सुधारणेमुळे मालगाड्यांचा टर्नअराउंड वेळ कमी होऊन एकूण मालवाहतूक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम झाले आहे.


याचा थेट फायदा स्थानिक उद्योग व व्यापाऱ्यांना होत असून मालवाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह झाली आहे. परिणामी, परिसरातील लॉजिस्टिक व्यवस्था अधिक सुरळीत होत असून प्रादेशिक आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. नांदेड विभागाने मालवाहतूक सेवा अधिक सक्षम करण्यासाठी, पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि नवोन्मेषी उपाययोजना राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याची ग्वाही दिली आहे.


