श्री लक्ष्मी नृसिंह (नरोबा) मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, श्रीराम कथा व नृसिंह जन्मोत्सवाला भक्तिमय प्रारंभ

नवीन नांदेड, प्रतिनिधी | बसवेश्वर नगर, जुना कौठा परिसर येथील श्री लक्ष्मी नृसिंह (नरोबा) मंदिर देवस्थानात दि. २४ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत १६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, श्रीराम कथा व श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे व भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर संस्थान व कार्यकारिणी मंडळाच्या वतीने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आठ दिवस विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर भारावून जाणार आहे. सप्ताहादरम्यान पहाटे काकडा, अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, श्रीराम कथा, हरिपाठ तसेच दररोज रात्री हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनिक कार्यक्रमानुसार पहाटे ५ ते ६ काकडा, सकाळी ६ ते ७ अभिषेक, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते १२ गाथा भजन, दुपारी १ ते ४ श्रीराम कथा, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ आणि रात्री ८.३० ते ११ हरिकीर्तन असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

सप्ताहाची सुरुवात दि. २४ एप्रिल रोजी ह.भ.प. गुरुवर्य योगीराज महाराज पैठणकर यांच्या हरिकीर्तनाने झाली. पुढील दिवसांत ह.भ.प. आशाताई राऊत (लातूर), गुरुवर्य गुरुराज महाराज (देगलूर), ह.भ.प. जगन्नाथ पाटील महाराज (भाषा प्रभू), ह.भ.प. ज्ञानोबा माऊली शिंदगिकार, ह.भ.प. भगवान महाराज म्हाळंगीकर तसेच ह.भ.प. गणेश महाराज वारंगेकर यांची हरिकीर्तने होणार आहेत. दि. १ मे रोजी सकाळी १० ते १२ काल्याचे कीर्तन ह.भ.प. गणेश महाराज वारंगेकर यांच्या उपस्थितीत होणार असून दुपारी १२ वाजता महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे.

मंदिर संस्थानच्या कार्यकारिणीत अध्यक्ष गंगाप्रसाद धोंडीबाराव काकडे, सचिव निळकंठ विठ्ठलराव काळे, सहसचिव बालाजी माधवराव सोनवळे, कोषाध्यक्ष देविदास नारायण डुबूकवाड, विश्वस्त रामदेव किशनगोपाल पंडित, तुलजासिंह नारायणसिंह गहेलोत व रामप्रसाद छगनलाल शर्मा हे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. मंदिराचे पुजारी व्यंकटेश मुळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे. या अखंड हरिनाम सप्ताह, श्रीराम कथा व नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!