सरसम–दरेसरसम रस्त्यालगतच्या बॅरिकेट ठरताहेत जीवघेणा सापळा! ठेकेदाराच्या थातूर-मातूर कामावर नागरिकांचा संताप

हिमायतनगर, अनिल मादसवार | सरसम–दरेसरसम (ता. हिमायतनगर जि. नांदेड) येथील सरसम ते दरेसरसम दरम्यान नव्याने करण्यात आलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या कामात गंभीर त्रुटी उघड झाल्या असून, रस्त्यालगत उभारलेले सिमेंट बॅरिकेट (काँक्रीट खांब) आता अपघातांचे निमंत्रण ठरत आहेत.

हिमायतनगर तालुक्यातील सरसम इंदिरानगर पासून दरे सरसम या गावाकडे जाणाऱ्या डांबरीकरण रस्त्याचे काम अनुकतेच करण्यात आले आहे. सदर काम करतांना कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता उभारलेले हे सिमेंट कोंक्रेट बॅरिकेट वाहनधारकांसाठी जीवघेणा धोका निर्माण करत आहेत. रस्त्याच्या कडेला ना रिफ्लेक्टर, ना चेतावणी फलक…अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी हे पांढरे बॅरिकेट स्पष्ट दिसत नाहीत. परिणामी, चालकांचा अंदाज चुकून अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः दुचाकी स्वारांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरत आहे.

स्थानिक नागरिकांनी ठेकेदारावर थेट आरोप करत म्हटले आहे की, “काम केवळ बिल काढण्यासाठी घाईघाईत उरकले गेले असून सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे.” संबंधित विभागाच्या अभियंत्यांनीही या त्रुटीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मार्च एंडपूर्वी बिले काढण्यासाठी अंदाजपत्रक बगल देत काम उरकून टाकल्याचा आरोपही विकासप्रेमी नागरिकांतून होत आहे.

नागरिकांचा संताप उफाळला :
रस्त्याच्या कडेला अचानक उभे केलेले सिमेंट बोरिकेट रात्रीला जीवघेणे ठरत असून, त्यावर रिफ्लेक्टर, लाईट किंवा चेतावणी चिन्हांचा पूर्ण अभाव दिसून येत आहे. त्यामुळे रात्रीला ये जा करणाऱ्या वाहनांना अपघाताचा गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. रस्त्याची निर्मिती करतांना अत्यंत निक्कृष्टपणा व थातूर माथुर पद्धतीने काम करण्यात आले असून, अनेक ठिकाणी रस्ता उखडत आहे, त्यामुळं कामात दर्जाहीनता व नियोजनशून्यता स्पष्ट दिसत आहे.

नागरिकांच्या ठाम मागण्या :
सदर रस्त्याचे काम करताना संबंधित विभागाचे अभियंता यांचेही अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. काम सुरू असताना थेट उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या अभियंत्याच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम उरकले असल्याचे दिसत आहे. कुठे पूल उंच तर कुठे रस्ता खाली अशा पद्धतीचे रस्त्याचे ओबडधोबड काम करण्यात आले असून या कामाची गुंनियंत्रक मापक मशीनद्वारे चौकशी व्हावी. सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, रिफ्लेक्टर, साईनबोर्ड व प्रकाशयोजना करावी, संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

तसेच रस्त्याचे काम तांत्रिक निकषांनुसार पुन्हा तपासावे आणि “लोकांच्या जीवाशी खेळ करणारा हा प्रकार तात्काळ थांबवावा, अन्यथा भविष्यात अपघात झाल्यास ठेकेदार व संबंधित अभियंते यांनाच जबाबदार धरले जाईल,” असा इशारा शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासन आता जागे होणार का, की एखादा अपघात झाल्यावरच हालचाल करणार? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!