
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे युवा अध्यक्ष मुन्ना भाऊ शिंदे यांनी दिनांक 21 एप्रिलपासून सुरू केलेले आमरण उपोषण प्रकृती खालावल्यामुळे 23 एप्रिलच्या रात्री तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.


या निर्णयामुळे काही दिवसांपासून तणावपूर्ण असलेले शहरातील वातावरण आता काहीसे निवळले असून जाहीर करण्यात आलेला हिमायतनगर बंदही मागे घेण्यात आला आहे. परिणामी बाजारपेठ पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे.


उपोषणादरम्यान वाढत्या उन्हाचा तडाखा आणि अन्न-पाण्याचा पूर्ण अभाव यामुळे मुन्ना भाऊ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तत्काळ हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.


दरम्यान, उपोषण स्थगित केल्याबाबत गैरसमज होऊ नये, असे स्पष्ट करत मुन्ना भाऊ शिंदे यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे. “प्रकृती पूर्णपणे सुधारल्यानंतर पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठीचा लढा कायम राहणार आहे,” असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


या आंदोलनाला शहरातील विविध संघटनांचा तसेच नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत होता. मात्र प्रकृती खालावल्यामुळे उपोषण थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनीही दिलासा व्यक्त केला आहे. दरम्यान, प्रशासन या मागणीबाबत काय भूमिका घेते आणि पुढील काळात यावर कोणता निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
