
देगलूर| येथील बंडयाप्पा मठ संस्थान, गांधी चौक येथे गुरुवर्य पंडित बाबुरावजी उप्पलवार यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिष्यांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेमुळे हा सोहळा विशेष ठरला.


या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर म्हणाले की, आजच्या काळात अनेकजण आई-वडिलांविषयी कृतज्ञता विसरत आहेत. मात्र देगलूरकरांनी गुरु, आई-वडील यांच्याप्रती दाखवलेला आदर हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अनुकरणीय आहे. “आई, वडील आणि गुरुजन यांना कधीही विसरू नये,” असे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमात गुरुवर्य पंडित बाबुरावजी उप्पलवार व सौ. सरस्वतीबाई उप्पलवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोकशाहीर रमेश गिरी, दिगू तुमवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रमेश गिरी यांनी पंडितजींबाबतचे अनुभव सांगत त्यांच्या शताब्दी सोहळ्यालाही उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली. दिगू तुमवाड यांनी पंडितजींच्या मार्गदर्शनाखाली गरीब विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला.


पंडित उप्पलवार यांनी आयुष्यभर समाजसेवा केली असून, त्यांना सरस्वतीबाई यांची मोलाची साथ लाभली, असे वक्त्यांनी नमूद केले. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्याच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. या सोहळ्यात गुरुपाद्यपूजन, दीपप्रज्वलन, सत्कार व गौरवग्रंथ प्रकाशन असे कार्यक्रम झाले. कु. युगंधरा केचे यांच्या गायनाने कार्यक्रम रंगतदार झाला. त्यांना भार्गव देशमुख (तबला) व गजानन केचे (संवादिनी) यांनी साथ दिली. “शेवटपर्यंत समाजासाठी कार्य करत राहीन,” असा निर्धार पंडितजींनी व्यक्त केला.


या कार्यक्रमासाठी होटल येथील प्रसिद्ध समाजसेवक तात्या देशमुख, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा पत्रकार डॉ. शिवदास हमंद, डॉक्टर मुंडे आदीसह कार्यक्रमासाठी तेलंगाना,महाराष्ट्र, कर्नाटक येथील चाहते आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सुगावकर यांनी केले, प्रास्ताविक प्रा. डॉ. जगदीश देशमुख यांनी केले तर आभार गंगाधर बिल्लारीकर यांनी मानले.
