‘शिवा’तर्फे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात; भव्य मिरवणूक व विचारमंथन

नांदेड | ‘शिवा’ अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेली भव्य मिरवणूक हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. मिरवणुकीनंतर झालेल्या जाहीर सभेत महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे सखोल मंथन करण्यात आले.

यंदा ‘शिवा’ संघटनेच्या वतीने जयंतीचे २५ वे वर्ष साजरे करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.

मिरवणुकीची सांगता महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासमोर जाहीर सभेत करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ‘शिवा’चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे होते. उद्घाटक म्हणून राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, महापौर कविता मुळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रा. मनोहर धोंडे यांनी आपल्या भाषणात बसवकल्याण येथील अनुभव मंडप व परसू कट्टा मुक्त करण्याची तसेच महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती देशभर साजरी करण्याची मागणी केली. यासाठी लवकरच दिल्ली येथे भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी ‘शिवा’ संघटनेच्या कार्याचे कौतुक करत वीरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. स्वागताध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा गौरव करत सामाजिक समतेचा संदेश अधोरेखित केला.

यावेळी आमदार राजेश पवार, महापौर कविता मुळे, संतोष पांडागळे, अनिल पाटील निमटेककर, ऋषिकेश पालीमकर आदींनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठलराव ताकबीडे यांनी केले, तर सूत्रसंचालन संजय कोठाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या भव्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!