यवतमाळ प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांवर मोठी कारवाई; २० लाखांचा मुद्देमाल जप्त

कृषी विभाग व पोलीस प्रशासनाची संयुक्त धडक कारवाई
यवतमाळ| जिल्ह्यात अवैध बियाणे विक्री व वाहतुकीविरोधात कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत प्रतिबंधित एचटीबीटी (प्लॅटिनम 5G) कापूस बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे २० लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ‘किया सोनेट’ (GJ-09-5486) तसेच अन्य एका चारचाकी वाहनातून प्रतिबंधित बियाण्यांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. या आधारे कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या सापळा रचून संबंधित वाहने अडवली.

सदर वाहणाची झडती घेतली असता पथकाला मोठ्या प्रमाणात अवैध बियाणे सापडले. त्यामध्ये: ‘प्लॅटिनम 5G’ कापूस बियाण्यांची ४०० पाकिटे (८ पोते) बियाण्यांची किंमत: ₹३.६० लाख, २ चारचाकी वाहने व ३ मोबाईल फोन इतर साहित्यांसह एकूण मुद्देमाल: ₹२०.०० लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) प्रेमनाथ आडे यांच्या फिर्यादीवरून यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संतोष ठाकरे (रा. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) निखिल लंगडे (रा. आर्वी, जि. वर्धा) सतीश ठाकरे (रा. अमरावती) यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींवर खालील कायद्यांनुसार गुन्हे दाखल: बियाणे कायदा १९६६, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, कापूस बियाणे अधिनियम २००९, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ आदि कलमांचा समावेश आहे.

अनधिकृत व प्रतिबंधित बियाण्यांची खरेदी केल्यास जमिनीचे तसेच पर्यावरणाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!