अक्षय तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

१०९८ हेल्पलाईनवर कळवा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली| येत्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये, यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनीही सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास १०९८ या निशुल्क हेल्पलाईनवर त्वरित कळवावे, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अक्षय तृतीयेसारख्या शुभ मुहूर्तावर बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास तो विवाह बालविवाह समजला जातो. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार वयाची पडताळणी शाळेचे अभिलेख, परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखल्यावरून करणे बंधनकारक आहे. आधार कार्ड वयाच्या पुराव्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.

बालविवाह रोखण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून पोलीस पाटील, सरपंच, शिक्षक, मंगल कार्यालय चालक, हॉटेल व्यावसायिक, बँडवाले, तसेच विवाह विधी करणारे भटजी यांच्यावरही असल्याचे त्यांनी सांगितले. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

तसेच, कोणत्याही ग्रामपंचायतीत बालविवाह झाल्यास त्या ग्रामपंचायतीचा विकास निधी रोखण्याची कारवाई करण्यात येईल. शाळांमधील विद्यार्थिनी सलग १० दिवस अनुपस्थित असल्यास मुख्याध्यापकांनी तात्काळ महिला व बालविकास विभागाला कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने हिंगोली जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेतली असून ग्रामपंचायतींना परिपत्रके पाठवण्यात आली आहेत. बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.

बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांना आवाहन: बालविवाहाची कुठलीही माहिती मिळाल्यास तात्काळ १०९८ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!