नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; रिश्टर स्केलवर 4.7 तीव्रता नोंद

जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन; कोणतीही जीवितहानी नाही

नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यात आज सकाळी 8.45 वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड शहरासह ग्रामीण भाग, अर्धापूर, हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील काही गावांमध्ये जमीन हलल्याची व भूगर्भातून आवाज आल्याची माहिती नागरिकांनी प्रशासनाला दिली.

प्राथमिक तपासणीनुसार National Center for Seismology च्या संकेतस्थळावर या धक्क्याची नोंद करण्यात आली असून भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली गावाच्या उत्तरेला असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असून यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. संबंधित तहसीलदारांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास याबाबत अहवाल सादर केला आहे.

दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. विशेषतः पत्र्याच्या घरांवर आधारासाठी ठेवलेले दगड तातडीने काढून सुरक्षिततेसाठी पत्रे व्यवस्थित बोल्टने बसवावीत, अशी सूचना त्यांनी दिली आहे. तसेच पुन्हा धक्का जाणवल्यास त्वरित घराबाहेर मोकळ्या जागेत जावे व प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले.

याबाबत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून त्यांनीही नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीसाठी (02462) 235077 हा संपर्क क्रमांक जारी केला असून, नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top