देगलूर तहसील कार्यालयासमोर दुष्काळी जीआरची होळी

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची थेट मदत, कर्जमाफी व पीकविमा देण्याची शिवसेनेची मागणी

देगलूर, गंगाधर मठवाले| महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकरी व शेतमजुरांसाठी ठोस आर्थिक मदत जाहीर न झाल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या वतीने देगलूर तहसील कार्यालयासमोर शासनाच्या जीआरची होळी करून निदर्शने करण्यात आली. सोमवार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने केवळ दुष्काळ जाहीर न करता प्रत्यक्ष मदत करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपये थेट मदत, खरीप पीककर्ज माफी, १०० टक्के पीकविमा भरपाई, रब्बी हंगामासाठी आर्थिक मदत, वीजबिल माफी आदी मागण्या करण्यात आल्या.

तसेच गावागावातील जळालेले ट्रान्सफॉर्मर २४ तासांत बदलणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे आणि बँकांकडून सुरू असलेली कर्जवसुली व जप्तीच्या नोटिसा थांबविण्याची मागणी करण्यात आली. शेतमजुरांना २५ हजार रुपये आर्थिक मदत व रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने ठोस पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करीत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र सरकारने २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, त्यानंतर पीकनुकसान पंचनामे व विविध सवलतींच्या उपाययोजना लागू करण्यात येत आहेत.

या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, विधानसभा मतदारसंघ संघटक राजेंद्र इंगळे खानापूरकर, शहरप्रमुख भगवान जाधव, युवा सेना तालुकाप्रमुख भागवत पाटील सोमुरकर यांच्यासह विविध पदाधिकारी, शेतकरी, शेतमजूर व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!