
शेतात आठ हजारांचा भाव, बाजारात मात्र पाच हजारांवर; मजुरीच्या वाढत्या खर्चाचाही फटका
देगलूर /शहापूर, गंगाधर मठवाले| यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन काढणीला शहापूर परिसरात सुरुवात झाली असून, उत्पादनात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. एकीकडे पिकाला अपेक्षित उत्पादन मिळत नसताना दुसरीकडे बाजारभावातही मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.


शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग व उडदाची लागवड केली होती. मूग व उडदाचे पीक वर्षभराच्या घरगुती गरजेपुरतेच घेतले जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या वापरासाठी कडधान्याची साठवण केली. मात्र, बाजारात पैसे मोजूनही मूग व उडदाची उपलब्धता कमी असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.


मूग व उडदाची काढणी पूर्ण झाल्यानंतर आता सोयाबीन काढणीला वेग आला आहे. मजुरांकडून कापणीसाठी मोठी मजुरी मागितली जात असल्याने शेतकऱ्यांनी शेतावरच मळणी यंत्राच्या सहाय्याने सोयाबीन काढण्यास प्राधान्य दिले आहे. एकरी सुमारे दोन हजार रुपये खर्च करून मळणी करून घेत शेतकरी पुढील रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत.


तुरीकडे कल; हरभऱ्याचे क्षेत्र घटले
यंदा तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने हरभऱ्याच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. पूर्वी ६० ते ७० टक्के क्षेत्रावर होणारी हरभऱ्याची लागवड आता केवळ २० ते २५ टक्क्यांपर्यंत राहिल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. उर्वरित क्षेत्रात हरभरा व धना पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून, त्यासाठी आता शेतकऱ्यांना पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे.


भावातील घसरणीने चिंता वाढली
सोयाबीन शेतात असतानाच बाजारात त्याचा भाव सुमारे आठ हजार रुपये असल्याचे शेतकरी सांगतात. मात्र आता सोयाबीनची काढणी करून बाजारात विक्रीसाठी गेल्यानंतर सुमारे पाच हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. उत्पादनात घट आणि त्यातच बाजारभावातील घसरण यामुळे खरीप हंगामाचे गणितच बिघडले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
